बाबा भांड (जन्म : २८ जुलै, इ.स. १९४९) हे औरंगाबादमध्ये राहणारे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार व प्रकाशक आहेत. त्यांनी इंग्रजी साहित्यात एम.ए. केले आहे. त्यांनी अल्पकाळ अध्यापनाचे काम केले आहे.

सहावीत असताना डायरी लिहिली. हे पहिले लिखाण अलीकडं २००१ साली पुस्तकरूपाने २००१ साली प्रकाशित झाली.

विद्यार्थीजीवनात स्काउटबरोबर त्यांना युरोपचा प्रवास करायला मिळाला. या अनुभवावर त्यांनी ’लागेबांधे’ नावाचे प्रवासवर्णन लिहिले आहे. बाबा भांड यांनी १९७५ मध्ये पत्‍नी सौ. आशा सोबत धारा व नंतर साकेत प्रकाशनाची स्थापना केली.. त्यांनी आजवर (ऑगस्ट २०१५) १७०० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या स्वतःच्या मराठीत दहा कादंबर्‍या प्रकाशित झाल्या असून, तीन कथासंग्रह, चार ललित गद्य, चार प्रवासवर्णने, दोन आरोग्यविषयक पुस्तके, तीन एकांकिका संग्रह, चार अनुवाद, नऊ संपादित पुस्तके, पंधरा किशोर कादंबर्‍या, अठरा बालकथा संग्रह आणि नवसाक्षरांसाठी सत्तावीस पुस्तके व इतर काही, अशा एकूण ८५ पुस्तकांचे लेखन, संपादन व निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे.

मुलांसाठी `साकेत सवंगडी’ नियतकालिकांचे त्यांनी दीर्घकाल संपादन, प्रकाशन केले आहे.

त्यांच्या “दशक्रिया” ह्या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. या कादंबरीसाठी त्यांना डझनावारी पुरस्कार मिळाले.

‘टीकास्वयंवर’सारखा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ग्रंथ प्रकाशित करणार्‍या ‘साकेत प्रकाशनाचे’ ते संचालक आहेत.

बाबा भांड यांच्या साहित्याचा हिंदी, इंग्रजी, कानडी, गुजरातीत अनुवाद झाला आहे.

५०१ अभंगांची रचना करणारा कृष्णा हा बाबा भांड यांचा पुतण्या देवभक्त योगी होता. त्याने २००६ साली अवघ्या पंचविशीत अग्निप्रवेश करून आयुष्य संपवले त्याच्या जीवनावर बाबा भांड यांनी ‘योगी’ ही कादंबरी, चरित्र, अभंगावर समीक्षा, ओवीबद्ध चरित्रे अशी लहान-मोठी पंधरा पुस्तके प्रकाशित केली.

बाबा भांड यांनी वयाच्या पासष्टीनंतर सर्व संस्थात्मक कामातून स्वेच्छा निवृत्ती घेतली असून, ते आणि पूर्णवेळ वाचन, लेखन, प्रकाशनासह शेती, प्रवास आणि छायाचित्रणाच्या छंदासाठी घालवतात. त्यांचे बहुतांशी जग बघून झाले आहे..

अभिप्राय द्या!