दिनांक 19 नोव्हेंबर 1960 च्या ज्या शासकीय ठरावान्वये मंडळाची प्रथम स्थापना झाली त्या ठरावानुसारच शासनाने मंडळाकडे खालील उद्दिष्टे व जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत –

  • महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती व इतिहास या क्षेत्रातील संशोधनांचे प्रकल्प वा योजना यांच्या पूर्ततेसाठी चालना देणे, मदत करणे वा अशा योजना मंडळाने स्वतः हाती घेणे.
  • अशा संशोधनांचे मराठीतून प्रकाशन करण्यासाठी चालना देणे, मदत करणे वा मंडळाने स्वतः प्रकाशित करणे.
  • स्वतंत्र व विद्यमान्य प्रबंध, व्याप्तिलेख, ग्रंथ, नियतकालिके त्याच प्रमाणे ज्ञानविज्ञानाच्या कोणत्याही शाखेतील कोणत्याही अन्य लेखनाचे मराठीतून प्रकाशन करण्यासाठी चालना देणे, मदत करणे वा मंडळाने ते स्वतः प्रसिद्ध करणे.
  • साहित्य अकादमीने आधीच भाषांतरासाठी हाती घेतलेले ग्रंथ वगळून मराठीखेरीज अन्य भारतीय भाषा व परदेशी भाषा यातील अन्य उत्कृष्ट ग्रंथांची मराठीत भाषांतरे करुन घेणे व ती प्रसिद्ध करणे. तसेच, अशा भाषांतराच्या योजनांस चालना देणे व मदत करणे.
  • महाराष्ट्राचा इतिहास व संस्कृती यांची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आधारभूत अशी महत्त्वाची प्रकाशित वा अप्रकाशित साधनसामग्री (कागदपत्रे) संपादित करणे, मराठीत भाषांतरित करणे व प्रसिद्ध करणे आणि अशा योजनांना चालना देणे, मदत करणे वा त्या योजना स्वतः कार्यान्वित करणे.
  • महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व वाङ्‌मयीन इतिहासाचे संपादन व प्रकाशन करण्याबाबतच्या योजनास चालना देणे, मदत करणे वा अशा योजना स्वतः कार्यान्वित करणे.
  • साहित्यविषयक संशोधन व साहित्याची अभिवृद्धी याबाबत शासकीय धोरण आखण्यासाठी शासनास मदत करणे.